Welcome to Jain Irrigation Systems Ltd.

 

Blog at Jains - भवरलालजी जैन उर्फ मोठे भाऊ ‘अनामिका बभुव’

आपली मुलेबाळे व कुटुंब मोठे व्हावे आणि त्यांचा व्यवस्थितपणे सांभाळ व्हावा यासाठी अपार कष्ट व मेहनत करून आणि प्रसंगी त्यागाची भूमिका स्वीकारून जो कर्तव्यभावनेने व प्रामाणिकपणे आपली जबाबदारी निभावतो व त्याबद्दल कधीही अवाक्षर काढत नाही तो माणूस वा गृहस्थ हे बाप, वडील किंवा पिता या संज्ञेला पात्र ठरतात.


आमचे वडील व जैन इरिगेशन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य भवरलालजी जैन यांनी १९८७ मध्ये भारतात सर्वप्रथम ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान आणून सिंचनाच्या क्षेत्रात मोठी क्रांती केली. हे तंत्रज्ञान विकसीत करताना त्यांच्या डोळ्यांसमोर छोटा, लहान, अल्पभूधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला सर्वसामान्य शेतकरी होता. त्याच्या उन्नतीचा, प्रगतीचा व कल्याणाचा ध्यास आयुष्यभर ऊराशी बाळगून ते कार्यरत राहिले. त्यामुळेच त्यांचा नामोल्लेख देशभर गौरवाने ‘फादर ऑफ इंडियन ड्रीप इरिगेशन’ आणि जगभर ‘फादर ऑफ स्मॉल होल्डर इरिगेशन’ याच शब्दात केला जातो. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठ्या भाऊंनी जे काम केले त्याबद्दल भारतातील व जगातील नामवंत संस्थांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला होता याची ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने आज विशेष आठवण झाली.

उणेपुरे ७९ वर्षांचे आयुष्य आमच्या वडीलांना लाभले पण दहा वेळा जन्म घेऊनही जे काम जमणार नाही ते मोठ्या भाऊंनी एका आयुष्यात पूर्ण केले. पीव्हीसी व एचडीपीई पाईपांची निर्मिती, ठिबक/स्प्रिकंलर - सुक्ष्म सिंचनाचे साहित्य, फळांवर व भाजीपाल्यावर प्रक्रिया करणारे कारखाने, टिश्यूकल्चर रोपांची निर्मिती, प्रिसिजन फार्मिंग, हाय-टेक शेती पध्दती व पाणलोट विकासाचे शास्त्रशुद्ध व परिपूर्ण मॉडेल म्हणून ‘जैन हिल्सची निर्मिती, सौर उर्जा आधारित उत्पादने, फोम शीटची निर्मिती, प्लंबिंगचे साहित्य, गांधी तीर्थ व अनुभूती शाळेची उभारणी या व यांसारख्या किती म्हणून गोष्टी सांगाव्यात. आज ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा धावता चलचित्रपट मनासमोर क्षणार्धात तरळला म्हणून तो इथे शब्दबद्ध केला. वडील हे एक पवित्र नाते असून तो सेवेचा वसा आणि वारसा आहे. त्यामुळे वडीलांच्या कष्टाचा, मेहनतीचा व सेवेचा श्रध्देय भावनेने व सन्मानपूर्वक गौरव व्हावा म्हणून जगात सर्वत्र दरवर्षी जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' (वडीलांचा मानसन्मान दिन) साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने वडीलांनी केलेल्या कार्याची जाणीवपूर्वक आठवण काढून त्या कार्याला उजाळा दिला जातो. अर्थात हा दिवस साजरा करण्याची पध्दत सुरू झाली ती अमेरिकेच्या पश्चिम व्हर्जिनिया या राज्यातील फेअरमॉन्ट येथील खाणीत ५.७.१९०८ रोजी झालेल्या एका अपघातामुळे. या अपघातात ३६० माणसे आणि मुले मरण पावली आणि एक हजार मुले आपल्या वडीलांना मुकली. या वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ फादर्स डे साजरा करावा अशी संकल्पना श्रीमती ग्रेस गोल्डन क्लेटॉन या अमेरिकन महिलेने मांडली. श्रीमती क्लेटॉन यांचे वडील १८९६ मध्ये वारले होते. त्यांना वडीलांच्या कष्टाची व त्यागाची आणि केलेल्या कामाची किंमत होती. पण समारंभपूर्वक पहिल्यांदा ‘फादर्स डे’ साजरा झाला तो १९ जून, १९१० रोजी वॉशिंग्टन येथे. दिवस साजरा करण्यास सुरुवात झाल्यानंतर ६२ वर्षांनी म्हणजे १९७२ मध्ये श्री. रिचर्ड निक्सन हे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांनी या दिवशी अधिकृत शासकीय सुट्टी जाहीर केली आणि वडीलांच्या कार्यकर्तृत्वाची सर्वांनी आठवण ठेवावी अशी अपेक्षाही व्यक्त केली.

मोठ्या भाऊंच्या या अतुलनीय व अजोड अशा कार्याला व त्यांच्या स्मृतीला आम्ही अत्यंत आदराने ‘फादर्स डें’ च्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो आणि श्रेष्ठ कवी कुलगुरू कालिदास यांच्या शब्दात म्हणतो -

‘अनामिका बभुव’! (यांच्यासारखा दुसरा नाही)

अशोक, अनिल, अजित, अतुल